कोंढाळी–काटोल मार्गावर भीषण अपघात: देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू; नवरात्रोत्सवाच्या रात्री काळाचा क्रूर घाला कारंजा
घाडगे(प्रतिनिधी): जगदीश कुर्डा
नवरात्रोत्सवाचा मंगल आणि भक्तिमय उत्साह सुरू असतानाच कोंढाळी–काटोल मार्गावर शनिवारी (१७ ऑक्टोबर) रात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. काटोल येथून देवीचे दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या तीन निष्पाप तरुणांवर काळाने झडप घातली. कलकुही–मेंढेपठार वळणावर दुचाकी आणि क्रूझर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात तिन्ही तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या एका मित्राचा समावेश असल्याने कारंजा आणि कोंढाळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भक्तीमय वातावरणात पसरली शोककळा
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ग्रामीण तालुक्यातील शिवा सावंगा येथील रहिवासी हेमराज गणपत उईके (२७) हे आपल्या कुटुंबासह क्रूझर वाहनाने (क्रमांक MH-27 BE-4389) श्रीक्षेत्र पारडसिंगा व काटोल येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते. त्याच वेळी कोंढाळी येथील विकास नगर परिसरात वास्तव्यास असलेले तीन तरुण आपल्या दुचाकीने (क्रमांक MH-31 BW-3404) काटोलहून देवीचे दर्शन घेऊन कोंढाळीकडे परत येत होते.
शनिवारी रात्री सुमारे ११:१५ ते ११:३० च्या सुमारास कलकुही–मेंढेपठार वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चेंदामेंदा झाला आणि तिन्ही तरुणांचा जागीच प्राणज्योत मालवली. आई जगदंबेच्या दर्शनावरून परतताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वांचेच हृदय पिळवटून टाकले.
मृत तरुणांची नावे:
१. दिपांशु दामोदर चाफले
२. रोशन दामोदर चाफले (दोघे सख्खे भाऊ)
३. लोकेश जगदीश बारंगे (मित्र)
हे तिघेही मूळचे वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथील रहिवासी असून कामानिमित्त कोंढाळीच्या विकास नगरमध्ये राहत होते. घरातून दर्शनासाठी आनंदाने निघालेल्या या तरुणांचे मृतदेहच परत आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलीस प्रशासन व नागरिकांची मदत
अपघाताची माहिती मिळताच कोंढाळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुमित परतेकी, हेड कॉन्स्टेबल प्रमोद तभाने, उमेश गुरनुले यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका चालक संजय गायकवाड, परिमल हिंगणकर व सागर भारसाकले यांनी बचाव कार्यात मोलाची मदत केली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
कोंढाळी पोलिसांनी क्रूझर चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोंढाळी व कारंजा (घाडगे) परिसरात शोककळा पसरली आहे.