लाडेगाव येथे रेड क्रॉस सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांसाठी दंत व आरोग्य तपासणी शिबिर; वृक्षारोपणाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

आर्वी : भारतीय रेड क्रॉस सोसायटी, आर्वी शाखेच्या वतीने लाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात २७ विद्यार्थ्यांची दंत व आरोग्य तपासणी करण्यात आली.
दंतरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष बुधवानी व डॉ. अमन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली, तर डॉ. अभिलाष धरमठोक व डॉ. उमेश गुल्हाने यांनी आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना दातांच्या स्वच्छतेचे महत्त्व सांगून टूथपेस्ट, टूथब्रश तसेच स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच देवेंद्र बोके, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली बोरवार, रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य ॲड. विनोद देशपांडे, डॉ. प्रतिभा पावडे, ॲड. अरुणा देशपांडे, प्रेमसिंग राठोड, नवलकिशोर अग्रवाल, किशोर चोरडिया, प्रा. रमेश जवंजाळ, प्रफुल ठाकरे, डॉ. सतीश ठाकरे, सुभाष वऱ्हेकर, सुरेश चांडक, सुशील लाठीवाला, नांदपूर केंद्राच्या विशेष शिक्षिका देविका पाटणे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी सरपंच देवेंद्र बोके, डॉ. अभिलाष धरमठोक आणि प्रेमसिंग राठोड यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना कराळे यांनी केले, तर मुख्याध्यापिका मनीषा ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अस्मिता बोरवार, प्रवीण बोरवार, रणजीत बोरवार, रामकृष्ण बोरवार, पूजा मडावी, पालक प्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
