आर्वीत अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; स्मारक व सभागृह उभारणीची आमदार सुमित वानखेडे यांची घोषणा

आर्वी : साहित्यसम्राट डॉ. बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जनता नगर येथील डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने गुरुनानक मंगल कार्यालयात भव्य जयंती व मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि समाजविकासाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाराव केचे होते, तर उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार सुमित वानखेडे उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, उपनगराध्यक्ष गौरव जाजू, महिला व बालविकास सभापती भारती पोटफोडे, डॉ. विनय देशपांडे, राजेश अहिव, विजय वाघमारे, ज्ञानदेव साठे, नगरसेवक जगन गाठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना आमदार सुमित वानखेडे यांनी मातंग व वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक व सभागृह उभारणीची घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यानंतर समाजाच्या वतीने आमदार वानखेडे, नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने आणि उपनगराध्यक्ष गौरव जाजू यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने आणि अशोकराव लोखंडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. प्रास्ताविकात राजेश अहिव यांनी समाजासमोरील विविध प्रश्न मांडले. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र खंडारे यांच्या पुढाकारातून हिमांशू रवींद्र खंडारे यांच्या हस्ते इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या दहा गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पेन, वह्या आणि कंपास बॉक्सचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमानंतर काँग्रेसचे महासचिव अनंत मोहोड, चंद्रशेखर जोरे, भाजप अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव विजयकर, राजेश शीरघरे यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मानवंदना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश लोखंडे यांनी केले, तर प्रवीण वानखेडे यांनी आभार मानले. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मार्गावर विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धीरज शिंदे, सचिन शिंदे, गजानन वानखेडे, अजय वानखेडे, रवींद्र खंडारे, विशाल वानखेडे, कुणाल वानखेडे, नाना बोभाटे, शुभम अवचारे, मंगेश बोबाटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
