लाडेगावात चक्रीवादळाचा भीषण तडाखा; घरे उद्ध्वस्त, वीज खांब कोसळले, अनेकजण जखमी

आर्वी तालुक्यातील लाडेगाव व परिसरात गुरुवारी सायंकाळी आलेल्या भीषण चक्रीवादळाने अक्षरशः धुमाकूळ घालत मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी घडवून आणली. वादळाच्या प्रचंड वेगामुळे अनेक घरांची पत्र्याची छप्परे उडून गेली, तर काही कच्ची घरे पूर्णपणे कोसळली. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वीजेचे खांब उन्मळून पडले असून वीजवाहिन्या तुटल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.
वादळाच्या तडाख्यात उडणारे पत्रे अंगावर पडणे तसेच घरांच्या भिंती कोसळल्याने अनेक नागरिक जखमी झाले आहेत. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती असून स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात येत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडणे, शेतीपिकांचे नुकसान आणि घरगुती साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक मदत, निवारा व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
