बसस्थानकासमोरील पुलावरील खड्डे ठरणार का जीवघेणे? सार्वजनिक बांधकाम विभाग अजून किती अपघातांची वाट पाहणार?

आर्वी शहरातील बसस्थानकासमोरील पुलावरील प्रचंड खड्ड्यांनी आता धोक्याची सर्व मर्यादा ओलांडली असून नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कोणत्याही क्षणी गंभीर अपघात घडू शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या मार्गावर दिवसभर मोठ्या वाहनांची वर्दळ असते. परिसरात शाळा, महाविद्यालये, बँका, सरकारी कार्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने हजारो नागरिक दररोज या पुलाचा वापर करतात. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय याच पुलालगत असताना अधिकारी दिवसातून अनेकदा या मार्गाने ये-जा करतात. मात्र पुलावरील जीवघेणे खड्डे आणि रस्त्यावर पडून असलेले दुरुस्तीचे साहित्य त्यांच्या नजरेस पडत नाही का, असा संतप्त सवाल आर्वीकर उपस्थित करीत आहेत.
पुलावर अनेक दिवसापासून मलबा तसेच पडून आहे. तेच साहित्य खड्ड्यांमध्ये भरून तात्पुरती दुरुस्ती करणेही विभागाला शक्य झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याचप्रमाणे कदम हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरील मोठमोठे खड्डेही अपघाताला निमंत्रण देत आहेत. याच परिसरात अपघात होऊन मृत्यू सुद्धा झालेला आहे.पावसाचे पाणी आणि चिखलामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त प्रश्न आता आर्वीकर विचारत आहेत. नागरिकांच्या जीविताशी खेळ करणारे हे दुर्लक्ष तातडीने थांबवून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित खड्डे बुजवावेत, अन्यथा संभाव्य अपघातांची नैतिक जबाबदारी संबंधित विभागावर राहील, अशी तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी आर्वीकरांनी केली आहे.
