जयदादा बेलखडे यांचा प्रहारला राजीनामा; दुसऱ्याच दिवशी पक्षातून हकालपट्टीचे पत्र!

आदल्या दिवशी राजीनामा, दुसऱ्या दिवशी हकालपट्टी; आर्वी विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चेला उधाण
जगदीश कुर्डा कारंजा घाडगे : आर्वी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रहार पक्षाचे नेते जयदादा बेलखडे यांनी प्रहार संघटनेतील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ८ ऑगस्ट रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, ९ ऑगस्ट रोजी वर्धा जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र प्रसिद्ध करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे ८ ऑगस्ट रोजी कारंजा येथे आले असता एका रेस्टॉरंटमध्ये जयदादा बेलखडे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा सादर केल्याचे सांगण्यात येते.
जयदादा बेलखडे यांनी बच्चू कडू यांच्या खांद्याला खांदा लावून आर्वी विधानसभा मतदारसंघात प्रहार संघटनेची मोठी बांधणी केली होती. विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतः निवडणूक लढवत १४ हजारांहून अधिक मते मिळविली होती. त्यामुळे आर्वी विधानसभा मतदारसंघात प्रहारचे संघटन मजबूत करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

दरम्यान, कारंजा नगरपंचायतीतील राजकीय समीकरणांवरूनही या घडामोडींकडे पाहिले जात आहे. कारंजा नगरपंचायतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष व नगरसेवक आहेत. जयदादा बेलखडे आणि नगरपंचायत यांच्यातील राजकीय मतभेदांची चर्चा यापूर्वीही होती. ८ ऑगस्ट रोजी कारंजा येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित मेळाव्यात बच्चू कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमापासून जयदादा बेलखडे दूर राहिल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि जयदादा बेलखडे यांच्यातील राजकीय समीकरणांबाबत विविध चर्चांना उधाण आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारंजा परिसरातील बदलती राजकीय समीकरणे या निर्णयामागे कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मात्र, या सर्व घडामोडींना नाट्यमय वळण मिळाले ते ९ ऑगस्ट रोजी. वर्धा जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात जयदादा बेलखडे यांची प्रहार पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. तसेच, यापुढे जयदादा बेलखडे यांचा प्रहार पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, याबाबत जयदादा बेलखडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी “मला अशा प्रकारचे कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. मी स्वतःहून प्रहार संघटनेचा राजीनामा दिलेला आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
त्यामुळे जयदादा बेलखडे यांनी आधी राजीनामा दिला की त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, यावरून आता राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे. आगामी काळात जयदादा बेलखडे यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे आर्वी विधानसभा मतदारसंघासह कारंजा घाडगे परिसराचे लक्ष लागले आहे.