पत्रकाराला धमकावल्याचे प्रकरण तापले; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

पत्रकाराला धमकावल्याचे प्रकरण तापले; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
तहसीलदारांमार्फत निवेदन; पालकमंत्री व पोलीस अधीक्षकांची भेट घेणार पत्रकार


 जगदीश कुर्डा कारंजा (घाडगे) :

कथित खाद्यतेल भेसळीप्रकरणी बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने कारंजा तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी दैनिक ‘महासागर’चे वार्ताहर धीरज लालचंदजी कसारे यांनी कारंजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवत संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कारंजा परिसरातील एका तेल फॅक्टरीमध्ये कथित भेसळ होत असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाल्यानंतर पत्रकार धीरज कसारे यांनी माहितीची पडताळणी करून २० ऑगस्ट रोजी दैनिक ‘महासागर’मध्ये यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती.
दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कसारे हे जनजागृती कार्यक्रमाच्या बैठकीसाठी कारंजा पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाण्याच्या गेटजवळ ते उभे असताना अनुज राजेश जसानी यांनी त्यांच्याकडे बातमीबाबत जाब विचारल्याचे तक्रारीत नमूद आहे.


‘माझ्या दानी रिफायनिंग सेंटरची बातमी का लावली?’ असा सवाल करण्यात आल्यानंतर, बातमीत कोणत्याही फॅक्टरीचे नाव नमूद केलेले नसल्याचे कसारे यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने ‘चल, माझ्या गाडीवर बस, तुला बाहेर पाहून घेतो,’ अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी दिल्याच्या या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका पत्रकार संघटनांनी घेतली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ कारंजा तालुका पत्रकार संघ आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप झुटी, गौरव सोमकुवर, जगदीश कुरडा, चेतन काळे, संजय नागपुरे, धीरज कसारे, अनिल बगवे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वर्धा जिल्ह्यातील पत्रकार लवकरच पालकमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेणार आहेत. पत्रकारांवर होणारे दबावतंत्र, धमक्या आणि अशा घटनांबाबत सविस्तर चर्चा करून संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघटनांकडून देण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *