आर्वी आता सीसीटीव्हीच्या कवचात; १०७ कॅमेऱ्यांनी शहरावर २४ तास नजर  हायटेक आर्वी – २७ संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही, वानखेडे यांच्या पुढाकारातून सुरक्षेला बळ;

आर्वी आता सीसीटीव्हीच्या कवचात; १०७ कॅमेऱ्यांनी शहरावर २४ तास नजर
 हायटेक आर्वी – २७ संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही, ९ ठिकाणी नवीन बीट चौक्या
 सुमितभाऊ वानखेडे यांच्या पुढाकारातून सुरक्षेला बळ; वाहतूक शिस्तीसह गुन्हेगारीवर नियंत्रणाचा पोलिसांचा प्रयत्न


आर्वी

चोरी, गुन्हेगारी तसेच शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी आर्वी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. आमदार सुमितभाऊ वानखेडे यांच्या पुढाकारातून शहरातील २७ संवेदनशील ठिकाणी तब्बल १०७ हाय-रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि संवेदनशील भागांवर आता २४ तास पोलिसांची नजर राहणार आहे.
यासोबतच शहरातील ९ ठिकाणी नवीन बीट सिस्टम पोलीस चौक्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे.
शांतता समितीच्या बैठकीत आर्वीचे ठाणेदार सतीश डेहनकर यांनी शहरातील नव्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. नेहरू मार्केट, गांधी चौक, छत्रपती चौक, पुलगाव-नेरी मार्ग, तळेगाव-जांब मार्ग, दुर्गामाता मंदिर, शीतलामाता मंदिर, सारंगपुरी तलाव रोड, आंबेडकरनगर, शिरपूर मार्ग, पुष्पम चौक आणि महाकाली मंदिर परिसरासह गर्दीच्या व संवेदनशील भागांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.


वाहतूक व्यवस्थेलाही मिळणार शिस्तीचे बळ
पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणेसाठी नियोजित मास्टर प्लॅन तयार केला असून, गुन्हेगारी नियंत्रणासोबतच शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावरही भर दिला जाणार आहे. बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी रस्त्यांवर पांढरे पट्टे आखून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार आहे.
शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या प्रश्नाबाबत नगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे. तसेच १० आणि १६ चाकी अवजड वाहनांच्या शहरातील प्रवेशासाठी वेळेचे बंधन घालण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेतील वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघात कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
मान्यवरांकडून निर्णयाचे स्वागत
राहुल गोडबोले, शहराध्यक्ष, आर्वी : आमदार सुमितभाऊ वानखेडे यांच्या पुढाकाराने १०७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध होणे ही आर्वीकरांसाठी मोठी उपलब्धी आहे. वाढती चोरी आणि वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता या यंत्रणेमुळे गुन्हेगारांवर निश्चितच वचक बसेल.
गौरव जाजू, नगरपालिका उपाध्यक्ष, आर्वी : आर्वी शहर स्मार्ट आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि नवीन बीट चौक्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठे बळ मिळणार आहे. मोकाट गुरे आणि पार्किंगच्या प्रश्नावर नगरपालिका पोलिसांना आवश्यक सहकार्य करेल.
प्रकाश गुल्हाणे, माजी सभापती : गेल्या अनेक वर्षांपासून आर्वीकरांची सीसीटीव्हीची मागणी होती. ती आता पूर्णत्वास आली आहे. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच वाहतूक शिस्त सुधारण्यासही मदत होईल.
मनोज आगरकर, नगरसेवक, आर्वी : शहरात १०७ कॅमेरे बसविणे हा गुन्हेगारांसाठी मोठा इशारा आहे. गांधी चौक आणि नेहरू मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी २४ तास नजर राहणार असल्याने चोरी, भांडणे आणि अपघातांवर नियंत्रण आणण्यास मदत होईल.
‘सुरक्षित आर्वी’कडे ठोस पाऊल
सीसीटीव्हीचे विस्तृत जाळे, नवीन बीट चौक्या, वाहतूक नियमन, शाळांच्या वेळेतील विशेष बंदोबस्त आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण अशा विविध उपाययोजनांमुळे आर्वीच्या सुरक्षा व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे. ‘तिसऱ्या डोळ्या’च्या निगराणीमुळे गुन्हेगारांवर वचक आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *