अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण अग्नितांडव; तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू
SNCU कक्षात व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती; ३६ बालकांना वाचवण्यात यश, सहा बालकांवर उपचार सुरू
अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (SNCU) सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, कक्षातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरात गुदमरून तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही बालकांना भाजल्याची माहिती असून, त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात बालकांसाठी तीन अतिदक्षता कक्ष आहेत. या तीन कक्षांची एकूण क्षमता ३९ बालकांची आहे. आग लागली तेव्हा संबंधित कक्षात नऊ नवजात बालके उपचार घेत होती. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवरील डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ३६ बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, या दुर्घटनेत तीन चिमुकल्या जीवांचा दुर्दैवी अंत झाला. काही बालकांच्या हात-पायांना भाजल्याची माहिती समोर आली असून, त्यांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या कक्षांमधील बालकांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
विशेष म्हणजे, हा नवजात शिशु अतिदक्षता विभाग अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशामक व अग्निरोधक यंत्रणा नेमकी का कार्यान्वित झाली नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेनंतर रुग्णालयातील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय उपकरणांची देखभाल, अग्निशमन यंत्रणा आणि आपत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांची तयारी याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

मृत बालकांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
या हृदयद्रावक घटनेनंतर राज्य सरकारकडून मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच जखमी बालकांवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मृत्यू झालेल्या बालकांमध्ये पूजा बोरगे (रा. पुलगाव, जि. वर्धा) यांचा मुलगा, गायत्री प्रफुल चोपडे (रा. मुरखेड, ता. अंजनगाव सुर्जी) यांचा मुलगा आणि किरण बेठेकर (रा. बोराळा, ता. चिखलदरा) यांची मुलगी यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या घटनेची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या दुर्घटनेमुळे तीन निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेल्याने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणेतील त्रुटींची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करावे, अशी मागणी होत आहे.
