देहव्यापार प्रकरणानंतर अनधिकृत अतिथी विश्रामगृहावर प्रशासनाचा हातोडा

देहव्यापार प्रकरणानंतर अनधिकृत अतिथी विश्रामगृहावर प्रशासनाचा हातोडा
बसस्थानकासमोरील बांधकाम पोलीस बंदोबस्तात पाडण्यास सुरुवात

 

आर्वी शहरातील बसस्थानकासमोरील पुरुषोत्तम स्टोअर्सच्या वरच्या मजल्यावर असलेल्या एका अतिथी विश्रामगृहात सुरू असलेल्या कथित देहव्यापार प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर कारवाई करत संबंधित अनधिकृत बांधकामावर मंगळवारी (दि. 21 जुलै) हातोडा चालविला. पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेकडून बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली.
पोलिसांनी यापूर्वी या अतिथी विश्रामगृहावर धाड टाकून कथित देहव्यापाराचा पर्दाफाश केला होता. येथे अल्पवयीन मुले मुली व विद्यार्थी सुद्धा येत होते. या प्रकरणात विश्रामगृहाचे संचालक पुरुषोत्तम रावलानी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर नगर परिषदेकडून बांधकामाची तपासणी करण्यात आली असता संबंधित इमारतीचे बांधकाम आवश्यक परवानग्या न घेता करण्यात आल्याचे निष्पन्न झाले

नगर परिषदेने याप्रकरणी संबंधितांना सुमारे ९ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
या संपूर्ण कारवाईत आर्वी पोलिसांचे ठाणेदार सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता.
शहरात बेकायदेशीर व्यवसाय आणि अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, अशाच प्रकारच्या नियमबाह्य बांधकामांवर आणि बेकायदेशीर कृत्यांवरही सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *