आर्वी-तळेगाव मार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन; खड्ड्यांत ‘बेशरम’ची झाडे लावून प्रशासनाचा निषेध

आर्वी-तळेगाव मार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन; खड्ड्यांत ‘बेशरम’ची झाडे लावून प्रशासनाचा निषेध


आर्वी शहरातील शिवाजी चौक ते वर्धा टी-पॉइंटदरम्यानचा आर्वी-तळेगाव मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये ‘बेशरम’ची झाडे लावून प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा अनोखा मार्ग अवलंबला.
या मार्गावरील खड्डे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुरूम टाकून तात्पुरते बुजविले जातात. मात्र पावसामुळे हे मुरूम वाहून जात असल्याने खड्डे पुन्हा पूर्ववत होतात. परिणामी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अनेक अपघातही घडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.


या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत काँग्रेसच्या वतीने उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी तसेच आमदार सुमित वानखेडे आणि खासदार अमर काळे यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी डॉ. प्रा. सुधाकर भोयर, चंद्रशेखर वनस्कर, पंकज गोडबोले, कैलास अवथळे, मलिक पटेल, कालिदास कवाडे, राहुल शिरपूरकर, राजेश अजमीरे, शेखर पालेकर, सुनील टाके, यश शिरपुरे, रवींद्र पाटील, सौ. राधिकाताई मेंद्रे, मीनल भेंडे, रेणुका कडू, महेश बिलोले, पंजाबसिंग बावरी, राजेंद्र वासनिक, दिनेश चव्हाण यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आर्वी शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. प्रा. सुधाकर भोयर म्हणाले की, “आर्वी-तळेगाव मार्गाची अवस्था गेल्या सात-आठ वर्षांपासून अत्यंत दयनीय आहे. दरवर्षी केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते; मात्र कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणखी एखादा गंभीर अपघात होण्यापूर्वी संबंधितांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा.”
या आंदोलनामुळे आर्वी-तळेगाव मार्गाच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांनीही रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *