रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटीच्या अध्यक्षपदी रोटेरियन रवि मंशानी, सचिवपदी रोटेरियन प्रविण सूर्यवंशी

स्थानिक रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटी, आर्वीच्या वर्ष २०२६-२७ च्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी (२६ जुलै) रूणीचा धाम येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी रोटेरियन रवि मंशानी यांनी अध्यक्षपदाची, तर रोटेरियन प्रविण सूर्यवंशी यांनी सचिवपदाची धुरा स्वीकारली. कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ॲक्युपंक्चर थेरपी शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल रोटेरियन महेश मोकलकर, आर्वीचे आमदार सुमित वानखेडे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन मनोज मोहता तसेच रोटेरियन मनीष अग्रवाल उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मावळते अध्यक्ष रोटेरियन सुनील बाजपेयी आणि मावळते सचिव रोटेरियन रवि मंशानी यांनी नवीन कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्द केला. त्यानंतर अध्यक्षपदी रोटेरियन रवि मंशानी व सचिवपदी रोटेरियन प्रविण सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारत आगामी वर्षात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी आमदार सुमित वानखेडे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत दिव्यांग बांधवांसाठी अधिकाधिक सेवा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. माजी प्रांतपाल महेश मोकलकर यांनी रोटरी क्लबने भविष्यात अधिक प्रभावी, लोकाभिमुख व समाजोपयोगी प्रकल्प राबवावेत, असे मार्गदर्शन केले. सहाय्यक प्रांतपाल मनोज मोहता आणि रोटेरियन मनीष अग्रवाल यांनीही रोटरीच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन रोटेरियन ललित संकलेचा यांनी केले, तर सूत्रसंचालन रोटेरियन अशोक राठी व रोटेरियन विजय अग्रवाल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या पदग्रहण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटी, आर्वीचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
