कारंजा घाडगे येथे महावितरणचा भोंगळ कारभार; २३४ युनिट वापरासाठी थेट २४,५५० रुपयांचे वीज बिल!  

कारंजा घाडगे येथे महावितरणचा भोंगळ कारभार; २३४ युनिट वापरासाठी थेट २४,५५० रुपयांचे वीज बिल! 


 जगदीश कुर्डा कारंजा घाडगे प्रतिनिधी

महावितरणच्या हलगर्जी कारभाराचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य वीज ग्राहकाला बसल्याची धक्कादायक घटना कारंजा घाडगे येथे समोर आली आहे. येथील रहिवासी हिम्मतसिंग भोजासिंग टाक यांना जुलै २०२६ महिन्यासाठी केवळ २३४ युनिट्स वीज वापर असूनही तब्बल २४ हजार ५५० रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक क्रमांक ४०२४६१०४६८४४ असलेल्या या घरगुती वीज जोडणीचा मंजूर भार केवळ ०.३५ केडब्ल्यू आहे. जुलै महिन्याच्या बिलात मागील रीडिंग १३५८ तर चालू रीडिंग १५९२ अशी नोंद असून, प्रत्यक्ष वापर फक्त २३४ युनिट्स इतकाच आहे.
सर्वसाधारण दरानुसार एवढ्या वापरासाठी अंदाजे १,५०० ते २,५०० रुपये इतकेच बिल अपेक्षित असताना महावितरणने थेट २४,५५० रुपये (मुदतीनंतर २४,५८० रुपये) इतके अवाजवी बिल आकारल्याने ग्राहकाला मोठा आर्थिक धक्का बसला आहे.
या प्रकारामागे संगणकीय त्रुटी, चुकीची नोंद किंवा संबंधित कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा चुकीच्या बिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना वारंवार महावितरण कार्यालयाचे फेरे मारावे लागतात, तसेच आर्थिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सदर चुकीचे बिल रद्द करून सुधारित बिल देण्यात यावे, तसेच दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी कारंजा घाडगे परिसरातील वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
महावितरणच्या अशा भोंगळ आणि बेफिकीर कारभारामुळे ग्राहकांचा विश्वास डळमळीत होत असून, भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *