स्मार्ट मीटर बिलांवर नागरिकांची नाराजी; मीटर तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणेची मागणी
जगदीश कुर्डा कारंजा घाडगे :
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलांमध्ये मोठी वाढ झाल्याची तक्रार करत कारंजा घाडगे परिसरातील अनेक वीज ग्राहकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तक्रारींचे योग्य निराकरण होत नसल्याचा आरोप करत मीटर तपासणीसाठी स्वतंत्र व निष्पक्ष यंत्रणा नियुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अपेक्षेपेक्षा अधिक वीजबिले येत असून त्याबाबत महावितरण कार्यालयात तक्रार केल्यास “वीज वापर वाढला असेल”, “उन्हाळ्यामुळे वापर अधिक झाला असेल” किंवा “बिल योग्य आहे” अशा कारणांवर समाधान मानण्यास सांगितले जाते. काही ग्राहकांचा दावा आहे की, बिलाची रक्कम प्रथम भरावी, त्यानंतर मीटरमध्ये दोष आढळल्यास पुढील बिलात समायोजन केले जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. तसेच बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशाराही दिला जात असल्याचे काही ग्राहकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यात अडचणी येत असल्याने त्यांच्या तक्रारींकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. काही ग्राहकांनी मीटरमध्ये दोष असल्याचा संशय व्यक्त करून पूर्वीप्रमाणे सामान्य मीटर बसविण्याची तयारी दर्शविली असतानाही स्मार्ट मीटरच वापरावे लागतील, असे सांगण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नागरिकांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, मीटर दोषपूर्ण आहे की नाही, याची तपासणी महावितरणकडूनच केली जात असल्याने प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. तक्रार ज्या संस्थेविरुद्ध आहे, त्याच संस्थेकडून मीटर योग्य असल्याचा अहवाल दिला जात असल्याने ग्राहकांचा विश्वास बसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर, स्मार्ट मीटरची तपासणी करण्यासाठी महावितरणपासून स्वतंत्र आणि निष्पक्ष तांत्रिक संस्था किंवा एजन्सी नियुक्त करावी, तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे पारदर्शक व वेळेत निवारण व्हावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांचा प्रतिसाद उपलब्ध झाल्यास तो प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच जनप्रतिनिधींनीही या प्रश्नात लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.