कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चूभाऊ कडू यांना निवेदन; आक्रमक पाठपुराव्याचे आश्वासन

: प्रहार सिडेट कामगार संघटनेच्या वतीने विधानपरिषद आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.

भेटीदरम्यान कंत्राटी पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, वेतनातील तफावत, कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बच्चूभाऊ कडू यांनी कामगारांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित प्रश्नांवर आक्रमक पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी प्रहार संघटनेचे आर्वी विधानसभा प्रमुख जयकुमार बेलखडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कामगारांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने लढा देत असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी भविष्यातही आंदोलन व पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
