आमदारांच्या दौऱ्यापूर्वीच राजकीय वर्तुळात खळबळ: जयकुमार बेलखडे प्रहारला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात?

जगदीश कुर्डा कारंजा (घाडगे):
येत्या ८ तारखेला प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि शिवसेना नेते किरण पांडव हे कारंजा शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कारंजा येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वीच आर्वी विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे प्रहार संघटनेचे आर्वी विधानसभा प्रमुख जयकुमार बेलखडे हे कमालीचे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक राजकीय समीकरणांमुळे नाराजी?
जयकुमार बेलखडे यांची आर्वी विधानसभा मतदारसंघात प्रहार संघटनेचा प्रमुख चेहरा म्हणून ओळख आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रहारकडून निवडणूक लढवत तब्बल १४ हजार मते मिळवली होती. कारंजा नगरपंचायत हे त्यांचे मुख्य केंद्र मानले जाते, जिथे शिवसेना आणि स्थानिक सत्ताधारी गट त्यांच्या विरोधात आहेत.
ज्या स्थानिक विरोधकांचा सामना बेलखडे सातत्याने करत आले आहेत, त्यांच्याच व्यासपीठावर पक्षप्रमुख बच्चू कडू उपस्थित राहणार असल्याने बेलखडे यांच्यात असंतोष निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेची ‘मशाल’ हाती धरणार?
या संपूर्ण प्रकरणावर जयकुमार बेलखडे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातत्याने निर्माण होणाऱ्या राजकीय पेचप्रसंगामुळे बेलखडे प्रहार संघटनेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘मशाल’ हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या काही दिवसांत जयकुमार बेलखडे काय भूमिका घेतात आणि आमदार बच्चू कडू यांच्या दौऱ्यानंतर आर्वी विधानसभा मतदारसंघासह कारंजा शहरात काय नवीन राजकीय समीकरणे आकाराला येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.