आमदार सुमित वानखेडे यांनी दिलेला शब्द खरा ठरवला,८ ऑगस्टला ३०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजन
तळेगावच्या विकासाला नवे पंख

आष्टी तालुक्यातील तळेगावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा ऐतिहासिक क्षण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आमदार सुमित वानखडे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत तळेगाव येथे ३०० खाटांच्या अत्याधुनिक व सर्व सुविधांनी सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन ८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री पंकज भोयर तसेच आमदार सुमित वानखडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रकल्पामुळे तळेगावसह संपूर्ण आष्टी तालुक्याच्या आरोग्य सेवेला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
आजपर्यंत तालुक्यातील नागरिकांना गंभीर उपचारांसाठी अमरावती, नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र हे अत्याधुनिक रुग्णालय उभारल्यानंतर अनेक वैद्यकीय सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असून रुग्णांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
तळेगाव हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगतचे महत्त्वाचे शहर असल्याने परिसरातील अनेक गावांतील नागरिकांसह महामार्गावरील अपघातग्रस्तांनाही या रुग्णालयाचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे तळेगाव हे भविष्यात आरोग्य सेवेचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अत्याधुनिक रुग्णालयामुळे आपत्कालीन उपचारांना मिळणार वेग
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये गंभीर जखमींना उपचारासाठी अमरावती किंवा नागपूर येथे हलवावे लागत होते. ३०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय सुरू झाल्यानंतर अशा रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असून परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांनाही दर्जेदार आरोग्य सेवा आपल्या जवळ उपलब्ध होणार आहे. तळेगावच्या विकासात हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
