आर्वी बसस्थानकाचे बदलणार रूप; ₹2.53 कोटींच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते

आर्वी बसस्थानकाचे बदलणार रूप; ₹2.53 कोटींच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते 


आर्वी : शहरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आर्वी बसस्थानकाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या महत्त्वाकांक्षी विकासकामाचा शुभारंभ आमदार सुमितभाऊ वानखेडे यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करून करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या विकासकामासाठी शासनाने ₹2 कोटी 53 लाखांचा निधी मंजूर केला असून, काम पूर्ण झाल्यानंतर बसस्थानक परिसराचे रूपडे पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ, सुस्थितीत आणि सुरक्षित वातावरणात प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास नगराध्यक्षा सौ. स्वाती प्रकाश गुल्हाणे, उपाध्यक्ष गौरव जाजू, भाजपा नेते विजय बाजपेयी, शहराध्यक्ष राहुल गोडबोले, माजी नगराध्यक्ष जगनराव गाठे, अनिलभाऊ जोशी, नगरपालिकेचे नगरसेवक-नगरसेविका, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुमितभाऊ वानखेडे म्हणाले की, “आर्वी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सातत्याने निधी उपलब्ध करून दिला जात आहे. बसस्थानक हे शहराचे प्रमुख प्रवेशद्वार असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्याच उद्देशाने हे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.”


यावेळी त्यांनी आर्वी आगाराच्या विकासासाठी भविष्यातही विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली आणि वेळेवर एसटी सेवा मिळावी यासाठी बसफेऱ्यांची संख्या वाढविणे, नवीन मार्ग सुरू करणे, प्रवासी निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देत आर्वी आगाराचे आधुनिकीकरण करून ते आदर्श बसस्थानक म्हणून विकसित करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधून त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.


या विकासकामामुळे दररोज बसस्थानकाचा वापर करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, आर्वी शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *