आमदार सुमित वानखेडे यांच्या उपस्थितीत शासकीय तंत्रनिकेतनची ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली

आमदार सुमित वानखेडे यांच्या उपस्थितीत शासकीय तंत्रनिकेतनची ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रध्वजाबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आर्वी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने ही भव्य रॅली काढण्यात आली. आमदार सुमित वानखेडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करून दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या परिसरात वृक्षारोपणही केले.

तिरंगा हातात घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘स्वातंत्र्यदिन चिरायू होवो’ तसेच ‘लाँग लिव्ह इंडिपेंडन्स’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रॅली निंबोली, शेंडे, वाठोडा, भाईपूर आदी परिसरातून मार्गक्रमण करून पुन्हा संस्थेच्या पटांगणात आली.

यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. मानकर यांनी अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला रसायन अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एम. डी. वाघमारे, अनुविद्युत विभागप्रमुख डॉ. विकास डोंगरे, यंत्र विभागप्रमुख डॉ. एन. जे. शिरभाते, विद्युत विभागप्रमुख प्रा. रंजना वानखडे, स्थापत्य विभागप्रमुख डॉ. आनंद इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. योगेश फुटाणे यांच्यासह संस्थेतील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संस्थेच्या परिसरात विद्यार्थी सहभागातून व्यापक स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. प्रा. आनंद वानखडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्यात आला.

या संपूर्ण उपक्रमात संस्थेतील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख प्रा. प्रकाश कतोरे यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *