आर्वीच्या एसटी प्रवाशांना स्वातंत्र्यदिनाची भेट; ५ नव्या ‘जिजाऊ’ बसेस दाखल  आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नाला यश

आर्वीच्या एसटी प्रवाशांना स्वातंत्र्यदिनाची भेट; ५ नव्या ‘जिजाऊ’ बसेस दाखल

 आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नाला यश,

१५ ऑगस्टला ५ नवीन ‘जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण

आर्वी : स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर आर्वी शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार सुमित वानखेडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, आर्वी एसटी आगाराच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा ५ नवीन ‘जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचे १५ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पण करण्यात आले.
नवीन बसेसमुळे आर्वी आगाराची प्रवासी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक होण्यास मदत होणार आहे. या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सुविधांना प्राधान्य देण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेरे, माईक सिस्टीम, मोबाईल चार्जिंग पॉईंट्स तसेच आरामदायी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.


यापूर्वी १० बसेस, आता आणखी ५ दाखल
आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांतून यापूर्वीही आर्वी एसटी आगाराला १० नवीन बसेस मिळाल्या होत्या. त्यानंतर आता आणखी ५ बसेस आगाराच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत आणखी ५ नवीन बसेस उपलब्ध होणार असल्याने आर्वी आगारातील बसचा अनुशेष मोठ्या प्रमाणात भरून निघणार आहे.
यामुळे आर्वी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बसफेऱ्यांची उपलब्धता वाढून प्रवाशांना अधिक वेळेवर आणि सोयीस्कर सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
लोकार्पण सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
नवीन बसेसच्या लोकार्पण सोहळ्यास खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे, नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, उपाध्यक्ष गौरव जाजू जाधव यांच्यासह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आर्वी मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि नियमित एसटी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार सुमित वानखेडे यांनी व्यक्त केला.
नवीन ‘जिजाऊ’ बसेसमुळे आर्वी आगाराच्या सेवेला आधुनिकतेची जोड मिळाली असून, प्रवाशांच्या सुविधेत निश्चितच भर पडणार आहे. आमदारांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या या बसेसमुळे आर्वीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळाल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *