कारंजा घाडगे पोलीस ठाण्यात महिला संवाद उपक्रम संपन्न; सुरक्षा व सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन

जगदीश कुर्डा कारंजा घाडगे:
स्थानिक पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला बचत गट तसेच महिला प्रतिनिधींसाठी विशेष संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी आणि पोलीस प्रशासनाशी थेट समन्वय राहावा, या उद्देशाने पार पडलेल्या या बैठकीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पार पडलेल्या या बैठकीत उपस्थित महिलांना महिला सुरक्षा, पॉक्सो (POCSO) कायदा, वाढते सायबर गुन्हे व त्यापासून घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास न घाबरता तात्काळ पोलीस विभागाशी समन्वय साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमाला सुवर्णा चौधरी यांच्यासह परिसरातील विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व स्थानिक अशा सुमारे ६० ते ७० महिला उपस्थित होत्या. थेट संवादाच्या माध्यमातून महिलांच्या अडचणी समजून घेत त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.