आर्वीत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील  विहिरीत आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात?

आर्वीत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील  विहिरीत आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात?
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात खळबळ; मृतदेहाला दोरी बांधल्याने संशय बळावला

आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉटन मार्केट परिसरातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मंगळवारी सकाळी परिसरात एकच खळबळ उडाली. मृताची ओळख शेख शब्बीर शेख अल्ताफ (वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे) अशी झाली आहे. मृतदेहाला दोरी बांधलेली आढळून आल्याने ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत संशय निर्माण झाला असून मृत्यूचे गूढ कायम आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास काही नागरिकांना कॉटन मार्केट परिसरातील विहिरीत मृतदेह तरंगताना दिसून आला. नागरिकांनी तत्काळ याची माहिती आर्वी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.
प्राथमिक पाहणीत मृतदेहाला दोरी बांधलेली असल्याचे आढळून आले. त्यामुळे या घटनेबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्वी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.


कृषी बाजार समितीसारख्या वर्दळीच्या परिसरातील विहिरीत मृतदेह आढळल्याने व्यापारी, हमाल तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मृतदेहाला दोरी बांधलेली असल्याने या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आत्महत्या की घातपात, याचा उलगडा करण्यासाठी आर्वी पोलीस विविध बाजूंनी तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *