२८ वर्षांची परंपरा… यंदाही शिवशक्ती गणेश मंडळाचा विविध कार्यक्रमांचा जागर

२८ वर्षांची परंपरा… यंदाही शिवशक्ती गणेश मंडळाचा विविध कार्यक्रमांचा जागर
गणेशोत्सवानिमित्त धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक बांधिलकी, संस्कृती आणि प्रबोधनाचा जागर. याच भावनेतून स्थानिक रेल्वे स्टेशन परिसरातील शिवशक्ती गणेश मंडळातर्फे गेल्या २८ वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. यंदाही गणेशोत्सवानिमित्त १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी ‘थ्री स्टार एंटरटेनर’ ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला माजी आमदार दादारावजी केचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बुधवार, १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी महिला व मुलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री गौरी पूजन, तर शनिवार, १९ सप्टेंबर रोजी महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

रविवार, २० सप्टेंबर हा उत्सवातील विशेष आकर्षणाचा दिवस ठरणार आहे. यावेळी ‘आर्वी गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून डॉ. वसंतराव गुल्हाने यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच नगराध्यक्ष सौ. स्वातीताई प्रकाश गुल्हाने यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सामाजिक संस्थांचा, दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळाही यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला आमदार सुमितभाऊ वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, उपविभागीय अधिकारी विश्वासजी शिरसाठ, डॉक्टर अरुणजी पावडे आणि पोलीस निरीक्षक सतीशजी डेहनकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सोमवार, २१ सप्टेंबर रोजी मुलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, वक्त्या सौ. मीराबाई कडवे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार हरीजी काळे राहणार असून, अनिलजी जोशी प्रमुख उपस्थित म्हणून सहभागी होणार आहेत.
बुधवार, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कीर्तनकार सौ. अनुपमा संजय देशकर, नागपूर यांच्या कीर्तनातून उपस्थितांना भक्ती व ज्ञानाचा लाभ मिळणार आहे. २५ सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांची मालिका सुरू राहणार आहे.
गेल्या २८ वर्षांपासून शिवशक्ती गणेश मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाच्या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा आणि धर्मलाभासोबतच ज्ञानलाभ घ्यावा, असे आवाहन शिवशक्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *