पुलगावात बालकलाकारांचा नृत्याविष्कार; डान्स कॉम्पिटिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद

जय गुलालकर पुलगाव प्रतिनिधी

पुलगावात बालकलाकारांचा नृत्याविष्कार; डान्स कॉम्पिटिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद
दुर्वा कोरे प्रथम, रागिनी शर्मा द्वितीय तर अधिरा गावंडे तृतीय; २० बालकलाकारांचा सहभाग


श्री हनुमान मंडळ गणेशोत्सव समिती, रेल्वे स्टेशन चौक, पुलगाव यांच्या वतीने १९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या डान्स कॉम्पिटिशनला बालकलाकारांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील तब्बल २० बालकलाकारांनी या स्पर्धेत सहभागी होत आपल्या नृत्यकलेचे बहारदार सादरीकरण केले.
स्पर्धेत दुर्वा कोरे हिने प्रथम क्रमांक, रागिनी रामगोपाल शर्मा हिने द्वितीय क्रमांक, तर अधिरा गावंडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकासाठी अनंत राठी यांच्या वतीने ५ हजार १ रुपयांचे, द्वितीय क्रमांकासाठी रजत कैलास शर्मा यांच्या वतीने ३ हजार १ रुपयांचे, तर तृतीय क्रमांकासाठी राहुल काले यांच्या वतीने १ हजार १ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व २० बालकलाकारांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे बालकलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष संजयजी गाते, नगराध्यक्षा कविता सुनील ब्राह्मणकर, नगरसेविका अपूर्वा गौरव दांडेकर तसेच नगरसेवक प्रवीणजी पनिया यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे पर्यवेक्षण अर्चना कडवे व आशीष तुरणकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक प्रीती पवन मारोठिया व देवांश बंटी दुबे यांच्यासह श्री हनुमान मंडळ गणेशोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *