पर्युषण महापर्वानिमित्त मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात भक्तीमय वातावरण

पर्युषण महापर्वानिमित्त मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात भक्तीमय वातावरण
महिला, पुरुषांसह बालकांची दररोज मोठी उपस्थिती; विविध धार्मिक उपक्रमांनी मंदिर परिसर दुमदुमला
 पुलगाव प्रतिनिधी जय गुलालकर 


जैन धर्मातील अत्यंत पवित्र आणि आत्मशुद्धीचा संदेश देणाऱ्या पर्युषण महापर्वाला १६ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला असून, त्यानिमित्त शहरातील श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मंदिरात दररोज सकाळपासून धार्मिक विधी, पूजा-अर्चा, अभिषेक व शांतीधारा यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
पर्युषण महापर्व हे आत्मचिंतन, संयम, तप, त्याग आणि क्षमाभाव जागृत करणारे पर्व मानले जाते. या पवित्र पर्वानिमित्त महिला, पुरुष तसेच लहान मुलांचाही मोठ्या संख्येने सहभाग दिसून येत असून, संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. नव्या पिढीलाही जैन धर्माच्या संस्कारांची ओळख व्हावी, यासाठी धार्मिक उपक्रमांमध्ये बालकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे.
२४ सप्टेंबर रोजी पर्युषण महापर्वाच्या उत्तम आकिंचन या नवव्या दिवशी मुलनायक श्री मुनिसुव्रतनाथ भगवान यांच्या शांतीधारेचा मान श्री दिलीपराव, सौ. प्रतिभा, जय, अखिल, चंदा, किरण, दीक्षिता, उदयन, स्वरांशी, शिल्पा, शीतल, राजेंद्र, वंदना, आदित्य गुलालकर परिवार, पुलगाव निवासी यांना प्राप्त झाला त्याचप्रमाणे २४ तारीख – पर्युषण महापर्वाचा उत्तम आकिंचन नववा दिवस-विधिनायक श्री मुनिसुव्रतनाथ भगवान ची शातिधारा करण्याचे सौभाग्य श्री पंकज,पवन, सारिका, स्नेहा, श्रवण, सिद्धांत, शुभदा, अनय, महेन्द्र. समिता, सारंग समस्त पोहरे परिवार पुलगांव  निवासी याना प्राप्त झाले.

शांतीधारा, पूजन व धार्मिक विधींमध्ये भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेत भगवान मुनिसुव्रतनाथ यांचे दर्शन घेतले. पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मंदिरात सुरू असलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पर्युषण महापर्वाच्या माध्यमातून संयम, अहिंसा, अपरिग्रह, आत्मचिंतन आणि सर्व जीवांप्रती करुणा या जैन धर्माच्या मूलभूत मूल्यांचा संदेश दिला जात आहे. या पवित्र पर्वातील उर्वरित सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *