क्रीडांगणावर सेंट जॉन हायस्कूलचा दबदबा; विविध स्पर्धांत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

पुलगाव प्रतिनिधी जय गुलालकर :
सेंट जॉन हायस्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, पुलगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बुद्धिबळ, कॅरम, फुटबॉल, कबड्डी आणि क्रिकेट या विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध करत पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी पात्रता मिळवली आहे.
गांधी सिटी हायस्कूल, पुलगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट जॉन हायस्कूलची विद्यार्थिनी शिवांगी कुरझडकर हिने दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे तिची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा संकुल, देवळी येथे झालेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत वेदांत मिठोले याने उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक मिळविला. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, मिलिटरी स्कूल, पुलगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट जॉन हायस्कूलच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलींनी विजयी कामगिरी करत पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
एसबीएस वॉटर पार्क, पुलगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुलींनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळविला. त्यांच्या या कामगिरीमुळे पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
पुलगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेतही सेंट जॉन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. १७ वर्षे वयोगटातील मुली व मुलांनी उत्कृष्ट कामगिरी करत पुढील स्तरासाठी पात्रता मिळवली. तसेच १४ वर्षे वयोगटातील मुलांनीही उल्लेखनीय खेळ करत पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी निवड मिळवली.
विद्यार्थ्यांच्या या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय क्रीडा यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा सौ. प्रिती बोरसे, प्राचार्य संतोष यादव, क्रीडा शिक्षक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातही शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रोत्साहन दिले.