आर्वी शहरात बिबट्याचा मुक्तसंचार?; पहाटे दर्शनाने नागरिकांत खळबळ
कन्या शाळा–एसडीओ क्वार्टर परिसरातून वाघ साईनगरकडे हालचाल; मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये भीती

वनविभागाची गस्त वाढली; बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
आर्वी : आर्वी शहरातील वर्दळीच्या परिसरात पहाटे बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा, एसडीओ क्वार्टर परिसर तसेच वाघ साईनगरच्या दिशेने बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्या शाळेसमोरील एसडीओ क्वार्टर परिसरात मध्यरात्री बिबट्यासदृश वन्यप्राणी दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर वाघ साईनगर तसेच शिलाराम मंगल कार्यालयाच्या मागील भागातही त्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. गोकुळधाम कॉलनी आणि वर्धा रोड परिसरातही वन्यप्राणी दिसल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील निवासी भागाजवळच बिबट्याचा वावर असल्याची माहिती पसरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः पहाटे शाळेत जाणारे विद्यार्थी, महिला तसेच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाकडून परिसरात गस्त वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वन्यप्राण्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसराची पाहणी करण्यात येत असून, पायांचे ठसे किंवा अन्य पुरावे मिळतात का, याचाही शोध घेतला जात आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे
बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी रात्री तसेच पहाटेच्या वेळी एकट्याने निर्जन भागात जाणे टाळावे. लहान मुलांना घराबाहेर एकटे पाठवू नये. बिबट्या किंवा कोणताही वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा अथवा गर्दी करण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी.
दरम्यान, शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने या परिसरातील वन्यप्राण्याच्या हालचालींची तातडीने खातरजमा करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
