शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आमदार बकाने; पीक परिस्थितीची घेतली पाहणी

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आमदार बकाने; पीक परिस्थितीची घेतली पाहणी
विजयगोपाल, इंझाळा, चोंडी व तांबा परिसरात प्रत्यक्ष पाहणी; शासनाकडून मदतीसाठी पाठपुराव्याचे आश्वासन


पुलगाव : देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघातील काही भागात पावसाने ओढ दिल्याने पिकांवर झालेल्या परिणामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार राजेश बकाने यांनी विजयगोपाल, इंझाळा, चोंडी आणि तांबा परिसरातील शेतशिवारांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी आमदार बकाने यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. पावसाचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती, पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, उत्पादनात होणारी संभाव्य घट तसेच शेतीसमोरील अडचणी याबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.


कागदोपत्री अहवालापेक्षा बांधावरची वस्तुस्थिती महत्त्वाची
शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कागदोपत्री अहवालातून समजून घेण्याऐवजी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे आमदार बकाने यांनी यावेळी सांगितले. पावसातील खंडामुळे पिकांवर झालेला परिणाम आणि संभाव्य आर्थिक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडली.
पाहणीदरम्यान आमदार बकाने यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनही पर्जन्यमान, पिकांची स्थिती आणि नुकसानीच्या स्वरूपाबाबत माहिती घेतली. प्रत्यक्ष परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात भाजपचे जयंतजी कावळे, किसान मोर्चाचे माधवराव वानखेडे, मंडळ अध्यक्ष स्वप्निल खडसे, सुधाकर भानखडे, संजय बिन्नोड, श्रीकांत वाघाडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
“शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांवर शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असा विश्वास आमदार राजेश बकाने यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *