आर्वी नगरपरिषदेला व्यापारी संकुलासाठी ६२४०.३० चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य
आमदार सुमित वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश; शिवाजी चौकातील भाजप कार्यालयात नगराध्यक्ष स्वातीताई गुल्हाने यांच्या हस्ते भव्य सत्कार

आर्वी शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयाला शासनाची मंजुरी मिळाल्याने व्यापारी संकुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्वी नगरपरिषदेला व्यापारी संकुल उभारण्यासाठी ६२४०.३० चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. महसूल विभागाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
या निर्णयानंतर आर्वी येथील शिवाजी चौकातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आमदार सुमित भाऊ वानखेडे यांचा कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष स्वातीताई गुल्हाने यांनी आमदार सुमित भाऊ वानखेडे यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

नगराध्यक्ष स्वातीताई गुल्हाने यांच्या हस्ते सत्कार
व्यापारी संकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आर्वी शहरासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या या सत्कार सोहळ्यात नगराध्यक्ष स्वातीताई गुल्हाने यांनी आमदार वानखेडे यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

कार्यक्रमाचे संचालन गौरव जाजू यांनी केले. यावेळी आमदार सुमित भाऊ वानखेडे यांनी आर्वीच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत शहरासाठी आवश्यक असलेले प्रकल्प शासनाच्या माध्यमातून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
“आर्वीचा विकास हाच आपला ध्यास”
“आर्वीचा विकास हाच आपला ध्यास आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेले प्रकल्प शासनाच्या माध्यमातून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. व्यापारी संकुलामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना नियोजित सुविधा मिळतील आणि नगरपरिषदेच्या उत्पन्नालाही बळकटी मिळेल. आर्वी शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करू,” असा विश्वास आमदार सुमित भाऊ वानखेडे यांनी व्यक्त केला.
नझूल भूखंडावर उभारणार व्यापारी संकुल
मौजा आर्वी येथील नझूल शीट क्रमांक ४ मधील भूखंड क्रमांक ३/६/१ मधील ६२४०.३० चौ.मी. जमीन व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी आर्वी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. सदर जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने नगरपरिषदेकडे राहणार आहे.

जमीन ताब्यात मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी बांधकाम सुरू करणे बंधनकारक असून, शासनाच्या अटी तसेच विकास नियंत्रण नियमावलीचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.
व्यापाऱ्यांना मिळणार नियोजित सुविधा
शहरातील व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज व नियोजित व्यापारी संकुल उभारण्याची संधी या निर्णयामुळे उपलब्ध झाली आहे. व्यापारी संकुलामुळे शहरातील व्यापारी क्षेत्राला चालना मिळण्याबरोबरच नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. आता जमिनीचा ताबा, आराखडा, प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला गती देण्याची अपेक्षा आर्वीकरांकडून व्यक्त होत आहे.
यावेळी नगराध्यक्ष स्वातीताई गुल्हाने, उपाध्यक्ष गौरवभाऊ जाजू, पाणीपुरवठा सभापती अजयजी कटकमवार, शहराध्यक्ष राहुलजी गोडबोले, नगरसेवक लवेश गलोले, उषाताई सोनटक्के, उर्मिला पवार, देविदास जी साठे,संपदा जोशी, शुभांगी गाठे, सुनील बाजपेयी,माजी सभापती प्रकाशजी गुल्हाने, अनिलभाऊ जोशी, अरसलान खान, रामभाऊ निस्ताने, रोशन पवार, नंदूभाऊ थोरात, देवा साठे यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
