कारंजा तालुका दुष्काळी यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांचा एल्गार
खासदार अमर काळे, जयदादा बेलखेडे यांच्या नेतृत्वात नारा टी-पॉईंटवर भव्य रास्ता रोको; शेतकऱ्यांची मोठी गर्दी

जगदीश कुर्डा कारंजा (घाडगे) प्रतिनिधी
कारंजा तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असतानाही दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश न झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी नारा टी-पॉईंट येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वर्धा जिल्ह्याचे खासदार अमरभाऊ काळे आणि जयदादा बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. त्यामुळे नारा टी-पॉईंट परिसरात शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
कारंजा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या प्रारंभीच्या यादीत कारंज्याचा समावेश नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी निर्माण झाली होती.
‘फक्त कर्जमाफीने शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही’
यावेळी जयदादा बेलखेडे यांनी शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. “फक्त कर्जमाफी झाली म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. कारंजा तालुक्यात प्रत्यक्षात दुष्काळाची परिस्थिती आहे. पावसातील खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कारंजा तालुक्याला दुष्काळी सवलती मिळणे अत्यंत आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
तसेच आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित भाऊ वानखेडे यांनीही कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी बेलखेडे यांनी केली.

खासदार अमर काळे यांचा शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा
खासदार अमरभाऊ काळे यांनीही आंदोलनाला संबोधित करताना कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. “शेतकऱ्यांच्या मागण्या केवळ कागदावर न ठेवता त्यावर तातडीने निर्णय झाला पाहिजे. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवता कामा नये. कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण त्यांच्या सोबत आहोत,” अशी भूमिका खासदार काळे यांनी मांडली.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले. कारंजा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश, सरसकट कर्जमाफी आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील पीडित कुटुंबाला योग्य आर्थिक मदत या मागण्यांवर आंदोलक ठाम राहिले.
दरम्यान, कारंजा तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत यापूर्वी आमदार सुमित वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘ग्राउंड ट्रुथिंग’च्या आधारे ट्रिगर-१ लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कारंजा तालुक्याचा समावेश करण्याबाबत भूमिका व्यक्त केली होती.
मात्र, मागण्या प्रत्यक्षात मंजूर करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाल्याने या रास्ता रोको आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधले.