गुंजखेडा येथील वर्धा नदीपात्राची पाहणी करून कारवाईची मागणी

तहसील कार्यालयापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर अवैध रेती उपसा?
गुंजखेडा येथील वर्धा नदीपात्राची पाहणी करून कारवाईची मागणी
सामाजिक कार्यकर्ते प्रविण ढाणके यांची प्रशासनाकडे तक्रार


पुलगाव प्रतिनिधी जय गुलालकर
देवळी तालुक्यातील गुंजखेडा येथील वर्धा नदीपात्रातून कथितरित्या अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तहसील कार्यालय तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा प्रकार सुरू असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते प्रविण ढाणके यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
ढाणके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नदीपात्रातून अनधिकृतरीत्या रेती उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याचा आरोप आहे. २ ऑक्टोबर रोजी संबंधित घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून GPS लोकेशनसह छायाचित्रे प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारीत नदीपात्राची अधिकृत स्थळपडताळणी करून जवळील क्रशर मशीन परिसराचीही पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तेथे साठवण्यात आलेल्या रेतीची तपासणी व मोजमाप करून त्याबाबतचा अहवाल तयार करावा, अशी मागणी आहे.
नदीपात्रातील अनधिकृत उत्खननामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर तसेच पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असून, भविष्यात स्थानिक नागरिकांच्या पाणीपुरवठ्याबाबतही गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
घाटाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा, रेतीचे मोजमाप आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी. संबंधितांकडे परवाना अथवा शासनमान्य लिलाव असल्याची खात्री करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रविण ढाणके यांनी प्रशासनाकडे केली आहे.
“तहसील कार्यालय व पोलिस प्रशासनाच्या कार्यालयापासून काही अंतरावर हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. त्यामुळे प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. अवैध रेती उपसा व वाहतूक तात्काळ थांबवून झालेल्या कारवाईची माहिती तक्रारदाराला द्यावी.”
— प्रविण ढाणके, सामाजिक कार्यकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *