चार दशकांच्या आरोग्यसेवेला सलाम; डॉ. अरुण पावडे यांचा अमृत महोत्सवी गौरव

चार दशकांच्या आरोग्यसेवेला सलाम; डॉ. अरुण पावडे यांचा अमृत महोत्सवी गौरव


चार दशकांहून अधिक काळ वैद्यकीय सेवा, सामाजिक बांधिलकी आणि मानवतावादी कार्यातून आर्वी-वर्धा परिसरातील जनतेच्या आरोग्याची अविरत सेवा करणारे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटी, शाखा आर्वीचे संस्थापक डॉ. अरुण पावडे यांच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त अमृत महोत्सवी विशेष गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी, शाखा आर्वीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात डॉ. अरुण पावडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पावडे यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ आणि निस्पृह सेवाकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


सन १९८० पासून डॉ. पावडे यांनी वर्धा व आर्वी परिसरात वैद्यकीय सेवेचा वसा स्वीकारला. चार दशकांहून अधिक काळ सचोटी, समर्पण आणि सेवाभावाने त्यांनी हजारो रुग्णांना आरोग्यसेवा दिली. वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
आर्वी शहरात रक्तदान चळवळीला चालना देण्याबरोबरच रेड क्रॉसच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक उपक्रमांना त्यांनी दिशा दिली. महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष (२००८-०९), महाराष्ट्र रेड क्रॉस सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच वर्धा व आर्वी रेड क्रॉस सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या मानवतावादी कार्याची दखल घेत त्यांना ‘Humanitarian Work by Red Cross’ या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.


या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला इंडियन रेड क्रॉस सोसायटी, शाखा आर्वीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, कार्यकारी अध्यक्ष राजाभाऊ तेलरांधे, उपाध्यक्ष डॉ. अविनाश कदम, दीक्षित, अनिल भट, अॅड. विनोद देशपांडे, प्रा. रमेश जवंजाळ यांच्यासह रेड क्रॉसचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. डॉ. प्रमोद जाणे आणि डॉ. अविनाश लाव्हाळे यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. पावडे यांच्या कार्याचा गौरव केला.
वाढदिवसानिमित्त रेड क्रॉसला ऑक्सिजन मशिन्सची भेट
सत्काराला उत्तर देताना डॉ. अरुण पावडे यांनी आपल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रेड क्रॉस सोसायटीकडून मिळालेल्या ऑक्सिजन मशिन्स रेड क्रॉसच्या इन्स्ट्रुमेंट बँकेला भेट दिल्या. समाजसेवेच्या या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला आमदार सुमित वानखेडे, माजी आमदार दादाराव केचे, नगराध्यक्षा स्वाती गुल्हाने, उपाध्यक्ष गौरव जाजू, भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अॅड. शोभाताई काळे, नगरपालिकेचे सभापती व नगरसेवक, रोटरी क्लब ऑफ ऑरेंज सिटी, लायन्स क्लब, लायन सेवा, तालुका पत्रकार संघटना, मातृसेवा संघ तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब पावडे, डॉ. अशोक पावडे, डॉ. हर्षल पावडे यांच्यासह पावडे कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी, शाखा आर्वीच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *