लोखंडी पाइपच्या घावाने एकाचा बळी!
आपटी मार्गावरील पुलावर रक्तरंजित थरार; आपसी रंजिशीतून हल्ल्याचा संशय, दोघे अटकेत

पुलगाव प्रतिनिधी जय गुलालकर
आपसी रंजिशीतून झालेल्या वादाने बुधवारी सकाळी रौद्र रूप धारण केले. आपटी येथील नागसेन मारोतराव भगत (५०) यांच्यावर लोखंडी पाइपने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या भगत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
पुलगाव-आपटी मार्गावरील हनुमान मंदिराजवळील पुलावर सकाळी ८.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, गिरीश पद्माकर कोल्हे (४८) आणि अविनाश जानर्दन कोल्हे (४३), दोघेही रा. आपटी, यांनी नागसेन भगत यांच्यावर लोखंडी पाइपने हल्ला केल्याचे समोर आले आहे.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भगत यांना तातडीने पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी स्वांगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पुलगाव पोलीस तपास करून कारवाई करत आहे.
दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण काय, रंजिशीचे स्वरूप किती जुने आहे आणि घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पुलगाव पोलीस करीत आहेत.